प्रिय आई,
काल इथे जोहान्सबर्गमध्ये एका फळांच्या दुकानात गेलो होतो. सहज नजर एका पाकिटावर पडली. आंब्याची पोळी लाटून, सुंदर अशी त्याची सुरळी करून ती सील बंद करून ठेवली होती. बघू तरी काय आहे म्हणून घरी घेवून आलो. एक तुकडा तोंडात टाकला आणि आई तुझी आठवण आली. आठवतंय तुला ? मी शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये तू अशाच आंबा पोळ्या बनवून ठेवायचीस. आंब्याचा रस काढून त्याच्या पोळ्या बनवून मागच्या दारामध्ये वाळत ठेवायचीस. कधी स्वतः तर कधी आम्हाला राखण राखायला बसवायचीस. चिमण्या, कावळे , गाई , म्हशी असे कोणी येवून खाऊ नये म्हणून .
अशाच एका सुट्यांमध्ये तू वाळत घातलेल्या पोळ्या एका गाईने येवून खाल्या. आणि पूर्ण दिवस भर आपल्या मुलांच्या तोंडात घास नाही पडला म्हणून रडत राहीलीस . आज त्या घटनेला ३०- ३५ वर्ष उलटून गेली असतील पण आज ती आठवण एकदम ताजी होवून आली. आम्हाला त्यावेळेस काहीच वाटले नाही कारण परत तू काही दिवसात त्या पोळ्या केल्यास आणि आम्ही मिटक्या मारत खाल्या. पण आज त्या आठवणींनी डोळ्यात टचकन पाणी आले.
आज किती सोपे झाले आहे कि ७००० कि. मि. वर दूर सुद्धा ती गोष्ट मला मिळते पण ती घेताना त्याच्या मध्ये ingredients कोणते आहेत, त्याची validity किती आहे हे सर्व बघून घ्यावे लागते आहे . तुझ्या आंबा पोळ्यां खाताना ह्या गोष्टींचा विचार कधी आम्हाला करावा लागला नाही. किंबहुना आम्ही काय आणि किती खातो ह्याच्याकडे तुझी बारीक नजर असे. आमच्यासाठी कधी diet प्लान नसे पण आम्ही खातो ते पोष्टिक असेल ह्याची पूर्ण काळजी घेतली जायची. जास्त खाल्ले तर उष्णता वाढत नाही ना ह्याची खबरदारी घेतली जात असे.
आणि ज्यावेळेस त्या गाईनी त्या पोळ्या खाल्या त्यावेळेस आपली मेहनत कष्ट हे फुकट गेल्या पेक्षा आपल्या मुलांच्या तोंडात तो घास पडला नाही ह्याचे दुख तुला जास्त होते. ह्या भावनेचा अर्थ किंवा एक पैलू थोडा बहुत आज कळतो आहे ……
तुझा शैल
No comments:
Post a Comment