Janjira

Janjira
Killa

Sunday, April 09, 2017

221 B Baker Street

मी आठवीत असताना, आमच्या भारत चिल्ड्रेन्स अकॅडेमी मध्ये आमच्या प्रिंसिपल गोरे सरानी एक छोटीशी लायब्ररी चालू केली होती. नवीन नवीन इंग्लिश, मराठी, व हिंदी भाषेतली वेगवेगळ्या विषयांची, म्हणजे कथा, कादंबऱ्या, कविता, आणि झालेच तर सामान्य ज्ञानाची अशी पुस्तके आणली होती. लहानपणी वाचायची दांडगी हौस. त्यामुळे लगेच उड्या मारत ती पुस्तके घ्यायला तयार होतो. 

जरी इंग्रजी माध्यमातून शिकत असलो तरी घरी पहिल्यापासून आई खूप मराठी पुस्तके वाचायची आणि माझ्यासाठी आणायची. त्यामुळे बरीच मराठी पुस्तके कथा कादंबऱ्या वाचायची आवड वाढली होती. आठवी पर्यंत बाबासाहेब पुरंदर्यांचे "राजा शिवछत्रपती",  शिवाजी सावंतांचे "मृत्युंजय" "छावा", रणजित देसाईंचे "श्रीमान योगी" "राधेय" "स्वामी" अशी सगळी पुस्तके वाचून झालीच होती, शिवाय वपु, पुलं यांचीही जी मिळाली ती सर्व पुस्तके वाचली होती. त्यामुळे लायब्ररीच्या सर्व पुस्तकात पहिल्यावेळेसच नाथ माधवांचे सोनेरी टोळी हे पुस्तक सारखे खुणावत होते. पण त्याऐवजी माझ्या हातात आमच्या क्लास टीचरनी ठेवले सर ऑर्थर कॉनन डॉयल यांचे  "The Hound of Baskervillles"  जरी इंग्रजी माध्यमात शिकत असलो तरी अभ्यासा व्यतिरिक्त इंग्लिश भाषेतले वाचन फारसे वाचले न्हवते. पण शिक्षकांनी दिल्यानंतर आणि मुद्दाम वाचून बघ हे सांगितल्यानंतर काही उपाय न्हवता. 

पुस्तक घरी घेऊन आलॊ आणि वाचायला सुरुवात केली, काहीशा नाखुशीनेच. पहिला Chapter आहे " शेरलॉक होल्म्स " आणि पहिल्या पानांतच शेरलॉकने मला संपूर्णपणे गुंतवून टाकले आणि मला आजही आठवते आहे की ते सगळे पुस्तक मी २ दिवसात संपवून टाकले. ह्यात शाळा, खेळ आणि झोप हे सर्व धरून मी दोन दिवसात ते संपवले आणि माझी एका अतिशय बुद्धिमान अशा एका व्यक्तिमत्वाशी कायमची ओळख झाली. त्याच्यानंतर मला शाळेत काही  शेरलॉक होल्म्स ची इतर काही पुस्तके मिळाली नाहीत. पण दहावी झाल्यावर मी पुण्यात शिकायला आल्यावर हळू हळू त्याच्या दुसऱ्या कथा, कादंबऱ्या वाचायला मिळाल्या. आणि शेरलॉक हे व्यक्तिमत्व कायम कोरून राहिले. मनाच्या पटलावर ते एक अजरामर व्यक्तिचित्रण राहिले. त्याच्यानंतर अनेक डिटेक्टिव्ह कथा कादंबऱ्या वाचल्या पण आजही लक्षात राहिले तो म्हणजे शेरलॉक होल्म्सचं......... 

आज ह्याची अचानक आठवण का व्हावी? कारणही तसेच घडले. आज लहानपणा पासून मनाच्या कोंदणात असलेल्या त्या जगप्रसिद्ध पत्त्यावर भेट द्यायचे भाग्य लाभले. 221B  Baker  Street..... लंडनमधील जगविख्यात पत्ता.   

एका काल्पनिक व्यक्तिरेखेच्या काल्पनिक कथांमधील त्या वस्तू एका वेळेस तो खरंच होता आणि तो जिवंत होता असा आभास निर्माण करतात. त्याच्या कथा जर तुम्हाला आठवत असतील तर त्या सगळ्या गोष्टी खूप ओळखीच्या वाटतात. 


एक अविस्मरणीय अनुभव  






Sunday, May 11, 2014

प्रिय आई

प्रिय आई,

काल इथे जोहान्सबर्गमध्ये एका फळांच्या दुकानात गेलो होतो. सहज नजर एका पाकिटावर पडली. आंब्याची पोळी लाटून, सुंदर अशी त्याची सुरळी करून ती सील बंद करून ठेवली होती. बघू तरी काय आहे म्हणून घरी घेवून आलो. एक तुकडा तोंडात टाकला आणि आई तुझी आठवण आली. आठवतंय तुला ? मी शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये तू अशाच आंबा पोळ्या बनवून ठेवायचीस. आंब्याचा रस काढून त्याच्या पोळ्या बनवून मागच्या दारामध्ये वाळत ठेवायचीस. कधी स्वतः तर कधी आम्हाला राखण राखायला बसवायचीस. चिमण्या, कावळे , गाई , म्हशी असे कोणी येवून  खाऊ नये म्हणून .

अशाच एका सुट्यांमध्ये तू वाळत घातलेल्या पोळ्या एका गाईने येवून खाल्या. आणि पूर्ण दिवस भर आपल्या मुलांच्या तोंडात घास नाही पडला म्हणून रडत राहीलीस . आज त्या घटनेला ३०- ३५ वर्ष उलटून गेली असतील पण आज ती आठवण एकदम ताजी होवून आली. आम्हाला त्यावेळेस काहीच वाटले नाही कारण परत तू काही दिवसात त्या पोळ्या केल्यास आणि आम्ही मिटक्या मारत खाल्या.   पण आज त्या आठवणींनी डोळ्यात टचकन पाणी आले.

आज किती सोपे झाले आहे कि ७००० कि. मि. वर दूर सुद्धा ती गोष्ट मला मिळते पण ती घेताना त्याच्या मध्ये ingredients कोणते आहेत, त्याची validity किती आहे हे सर्व बघून घ्यावे लागते आहे . तुझ्या आंबा पोळ्यां खाताना ह्या गोष्टींचा विचार कधी आम्हाला करावा लागला नाही. किंबहुना आम्ही काय आणि किती खातो ह्याच्याकडे तुझी बारीक नजर असे. आमच्यासाठी कधी diet प्लान नसे पण आम्ही खातो ते पोष्टिक असेल ह्याची पूर्ण काळजी घेतली जायची. जास्त खाल्ले तर उष्णता वाढत नाही ना ह्याची खबरदारी घेतली जात असे.

आणि ज्यावेळेस त्या गाईनी त्या पोळ्या खाल्या त्यावेळेस आपली मेहनत कष्ट हे फुकट गेल्या पेक्षा आपल्या मुलांच्या तोंडात तो घास पडला नाही ह्याचे दुख तुला जास्त होते. ह्या भावनेचा अर्थ किंवा एक पैलू थोडा बहुत आज कळतो आहे ……


तुझा शैल
   

Friday, December 23, 2011

सत्य

ऑफिस मधून येत होतो. कार मध्ये ९३.५ fm लागले होते. RJ  विचारत होता वर्ष भरात कोणी खोटे वागला असलात आणि ते जर सगळ्या पुण्याला सांगायचे असेल तर sms करा .........

एक sms केलेला फोन कॉलर सांगत होता, " मी एका दुकानात एक जीन्सचे  (ट्रायल रूम मध्ये) रु ९९९ /- चे स्टीकर काढून रु ४९९ /- चे लावले, आणि ती जीन्स रु ४९९/- ला विकत घेवून गेलो."

त्या बद्दल त्या radio स्टेशन कढून त्या कॉलरला एक स्पोर्ट्स bag आणि एक jacket  मिळाले.

मनात विचार आला.

सत्य

म्हणजे नेहमी आणि पहिल्यापासून खरे असणे 
                               कि
असत्य किंवा खोटे वागून नंतर त्याची कबुली देणे ? 


सत्यासाठी हरिश्चंद्राला राज्य सोडावे लागले पण इथे असत्यासाठी पारितोषिके ?

आणि हे सर्व radio वर जग जाहीर करताना radio सारखे माध्यम असत्याला पाठींबा तर देत नाहीना ?
कारण आज सत्य बोलले तर काहीच मिळत नाही पण असत्याचा गवगवा केला तर बक्षिसे मिळतात

Saturday, April 10, 2010

आजी .....


मुरुड. माझे जन्म गाव. माझ्या आजीचे गाव. माझी आजी. दर वर्षाच्या सुट्या संपल्या कि परतताना एस टी गावच्या बाहेर कोटेश्वरीच्या मंदिराला वळसा घालून चढणीला लागली कि खिडकी मधून एका बाजूला नारळी पोफळी मधून दिसणारी सुबक कवलारू घरे, त्याला जोडून असलेला समुद्र किनारा आणि त्याच्या पुढे पसरलेला अथांग समुद्र दिसतो. इतकी वर्ष, इतक्या वेळा आलो पण दर वेळेस त्या चढणी वरून एसटी मधून त्या समुद्रा मध्ये माझ्या आजीचा चेहरा दिसतो. त्या समुद्राच्या लाटा आणि माझ्या आजीच्या चेहरया वरच्या सुरकुत्या ह्यात काही तरी विलक्षण साम्य आहे असे नेहमीच वाटते. ती एसटी, stand वरून निघाली कि माझ्या मामाच्या घरावरून जाते. तिथे दरवाज्यात आम्हाला हात करत बसलेली एसटीतून दिसणारी आजी आणि त्या कोटेश्वरीच्या वळणावरून दिसणारा तो समुद्र आजही परतीच्या वाटेवर मन उदास करतात आणि मग तो प्रचंड समुद्र डोळ्यातील त्या अश्रूचा थेंब होत धुरकट होत जातो. आणि त्याच वळणावरून जेव्हा मी मुरुडला येतो तेव्हा तो समुद्र आनंदाने किनारया वर उत्साहात माझी वाट बघत आहे असा वाटतो, पुन्हा दरवाज्यात बसलेल्या आजी सारखा. त्याचा आवाज पण जोरात लाटा आपटून खणखणीत जाणवतो , रस्त्यांनी चाललेल्या ओळखीच्या माणसाला `` अरे बेबीचा लेक येतोय, पुण्यात असतो ना " सांगत असलेल्या आजीच्या आवाजासारखा. बेबी हे माझ्या आईचे नाव.

माझी आजी. आताशी खूप थकली आहे. डोळ्यांनाही आता कमी दिसू लागले आहे. पण नजर आजही तीक्ष्ण आहे. घरात आणि बाहेर काय घडते त्यावर लक्ष कायम असते. नव्वदीच्या आस पास असताना आता एक एक अवयव साथ कमी देतो. पण व्यवहारिक जगातला चाणाक्षपणा अजून मजबूत आहे.

आजीच्या लहानपणी परिस्थिती अगदी गरिबीची. त्यामुळे का, त्यावेळेस मुलीना शिकवत नसत म्हणून कि काय, तिला लिहिता वाचता अजिबात येत नाही. पण रोजच्या व्यवहारात तिचे काहीही अडले नाही. ती शिकली नाही पण तिन्ही मुलांना शिकवून समृद्ध करायला अपार कष्ट घेतले. आम्हा नातवंडांच्या मागे सुद्धा नेहमी लागे कि खूप शिका आणि मोठे व्हा. ती दुकान जे चालवायची त्यात पैशांचा हिशेब अगदी चोख असे. गणपतीला आणि शिमग्याला दुकानात जर गर्दी झाली तर मामा, मामी आणि इतर कोणीही ह्यांचा हिशेबाचा बोजवार्या वाजलेला असे पण ही मात्र सगळे दुकान एकटीने सांभाळयाची आणि येणाऱ्या गीर्हय्काला दम द्यायला ही कमी करायची नाही.

तिचे बोलणेच सरळसोट आणि फटकळ आहे. आजही तसाच खणखणीत आवाज आणि ते बोलणे. अगदी जवळची कोणी माणसे जर बऱ्याच दिवसांनी आली तर सरळ विचारेल " इतके दिवस काय मेला होतास काय रे ? आजी आहे कि नाही ते बघायला पण आला नाहीस. का आजी मेली असे वाटले ?" ती तशी सगळ्यांची आजी होती किंवा कोणी वयानी मोठे असतील तर त्यांच्यासाठी ती दत्ताची आई असे. दत्ता म्हणजे माझा मामा.

ही कोकणची माणसे मरणा बद्दल फार आपुलकीनी बोलतात. कोणाविषयी विचारपूस केली कि काय रे बाब्या जित्ता हाए का मेला ? तर उत्तर म्हणून लगेच येणार जळला मेला बाब्या तो मरेल कशास ? मुंबईला जावून लेकाकडे दिवस काढतोय नाही?
बाकी कोकणातील माणसाना भूगोलात आपल्या भारताची सीमा ही बहुदा मुंबई पर्यंत जावून तिथेच संपते असे काही कल्पना  असावी. कारण सगळ्यांच्या परिसीमा ह्या मुंबई पर्यंतच जावून संपतात.

मला ते लहानपणीचे दिवस आठवतात. मामाचे घर हे मुख्य गावाच्या नाक्यावरच असल्यामुळे त्या रस्त्यावरून हर तर्हेची मिरवणूक, मोर्चा, झालच तर प्रेतयात्रा सगळे जायचे. रात्री अपरात्री सुद्धा एखादी प्रेतयात्रा चालली असेल कि तिच्या समोरील भजन म्हणारे त्यांच्या आवाजामुळे आजीला जाग आली कि ती आम्हाला सगळ्यांना उठवायची आणि मग आम्ही सुद्धा ती प्रेतयात्रा एखाद्या मिरवणुकीच्या कौतुकानी बघत असू. किंबहुना त्यामुळेच कि काय मला प्रेतयात्रा, प्रेत अशा गोष्टींचे भय लहानपणा पासून नव्हते.

लहानपणी आठवते की दर सोमवारी आजी शंकराच्या मंदिरात जायची अणि आम्हा नातवंड आना घेवुन जायची. तिथे शंकराच्या देवळात अणि सभोवताली विस्तृत असा खेळयाला परिसर होता. नारळी पोफळीची भोवताली सुंदर अशी झाडे होती. आता आजीला तिथे जाता येत नाही आणि आम्हाला तिला तिथे घेवुन जाताही येत नाही. पण तिथे गेलो की आजीचा हात धरून चालत गेल्याची आठवण होत असते.

मुरुड जंजिरा, हे गांव जंजिरा किल्ल्या साठी प्रसिद्ध आहे. जंजिऱ्या वर कलाल बांगडी नावाची तोफ आहे. भारतातील सर्वात मोठ्या तोफा मध्ये हिचा दूसरा नंबर लागतो. स्वातंत्र्यानंतर त्या किल्ल्या वर आता कोणीही तिथे रहात नाही. पण आजी सांगायची की स्वातंत्र्य मिळवण्या पुर्वी ती आणि आजोबा किल्यात सिद्धिच्या बायकाना बांगड्या भरायला जायचे. त्यावेळस ती कलाल बांगडी गड्गडली की म्हणे बायकांच्या हातात्तल्या बांगड्या फुटायच्या. ती तोफ महाराजाना मिळाली पाहिजे होती. मान्य की हिन्दू पत पातशाही स्थापायला तोफेपेक्षा सिंहाच्या काळजाची गरज होती. पण हे असले आयुध जर स्वराज्याला मिळाले असते तर...... असो आजी त्या तोफे सारखी खणखणत असे.

अजुन एक खुप मजेदार गोष्ट माझ्या आजीची. आम्ही आता सगळी नातवंड मोठी झालो. काही जणांची तर लग्न होवून त्याना मुले झाली. म्हणजे माझी आजी खरेतर पणजी झाली. आता फक्त घरात बसून असते. पण अजुनही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा माझ्या हातात शंभर, दोनशे रुपये जसे हाताला लागतील तसे ठेवते. तिच्या उशापशी ते पैसे असतात. ते येतात कुठून हा अजुनही अचंबित करणारा प्रश्न. खरेतर हातावर ठेवलेले पैसे घ्यायचे असे काही आता वय काही माझे राहिले नाही. पण तरीही मी लहान मुलाच्या हातावर ठेवलेल्या पैशा सारखे ते मी घेतो आणि रेवदंडा, अलीबाग येथील चिक्की किंवा ताटगोळे घेतो.

आज इतक्या लांब आल्या वर तिची आठवण सदा बेचैन करते.


२३ फेब्रुवरी २०१२ 


२१ ला रात्री राहुलचा फोन आला आणि लगेच निघालो.  त्याच कोटेश्वरीच्या वळणावर पोहचलो तर रात्रीचा दीड वाजला होता. खिडकीतून तो समुद्र बघितला पण आज तिचा चेहरा काही दिसला नाही. म्हटले अमावस्येची रात्र म्हणून त्या अंधारात दिसला नसेल.


२२ ला सर्व आटोपून परत निघालो. परत त्याच कोटेश्वरीच्या वळणावर आज गाडी थांबवून उतरलो. आज तरी तो चेहरा दिसेल पण इतक्या वेळ साठवलेल्या अश्रूंच्या  समुद्रात तो काही दिसेचना. आणि मग इतक्या वेळ आवरलेला बांध फुटला. .....