आजी .....
मुरुड. माझे जन्म गाव. माझ्या आजीचे गाव. माझी आजी. दर वर्षाच्या सुट्या संपल्या कि परतताना एस टी गावच्या बाहेर कोटेश्वरीच्या मंदिराला वळसा घालून चढणीला लागली कि खिडकी मधून एका बाजूला नारळी पोफळी मधून दिसणारी सुबक कवलारू घरे, त्याला जोडून असलेला समुद्र किनारा आणि त्याच्या पुढे पसरलेला अथांग समुद्र दिसतो. इतकी वर्ष, इतक्या वेळा आलो पण दर वेळेस त्या चढणी वरून एसटी मधून त्या समुद्रा मध्ये माझ्या आजीचा चेहरा दिसतो. त्या समुद्राच्या लाटा आणि माझ्या आजीच्या चेहरया वरच्या सुरकुत्या ह्यात काही तरी विलक्षण साम्य आहे असे नेहमीच वाटते. ती एसटी, stand वरून निघाली कि माझ्या मामाच्या घरावरून जाते. तिथे दरवाज्यात आम्हाला हात करत बसलेली एसटीतून दिसणारी आजी आणि त्या कोटेश्वरीच्या वळणावरून दिसणारा तो समुद्र आजही परतीच्या वाटेवर मन उदास करतात आणि मग तो प्रचंड समुद्र डोळ्यातील त्या अश्रूचा थेंब होत धुरकट होत जातो. आणि त्याच वळणावरून जेव्हा मी मुरुडला येतो तेव्हा तो समुद्र आनंदाने किनारया वर उत्साहात माझी वाट बघत आहे असा वाटतो, पुन्हा दरवाज्यात बसलेल्या आजी सारखा. त्याचा आवाज पण जोरात लाटा आपटून खणखणीत जाणवतो , रस्त्यांनी चाललेल्या ओळखीच्या माणसाला `` अरे बेबीचा लेक येतोय, पुण्यात असतो ना " सांगत असलेल्या आजीच्या आवाजासारखा. बेबी हे माझ्या आईचे नाव.
माझी आजी. आताशी खूप थकली आहे. डोळ्यांनाही आता कमी दिसू लागले आहे. पण नजर आजही तीक्ष्ण आहे. घरात आणि बाहेर काय घडते त्यावर लक्ष कायम असते. नव्वदीच्या आस पास असताना आता एक एक अवयव साथ कमी देतो. पण व्यवहारिक जगातला चाणाक्षपणा अजून मजबूत आहे.
आजीच्या लहानपणी परिस्थिती अगदी गरिबीची. त्यामुळे का, त्यावेळेस मुलीना शिकवत नसत म्हणून कि काय, तिला लिहिता वाचता अजिबात येत नाही. पण रोजच्या व्यवहारात तिचे काहीही अडले नाही. ती शिकली नाही पण तिन्ही मुलांना शिकवून समृद्ध करायला अपार कष्ट घेतले. आम्हा नातवंडांच्या मागे सुद्धा नेहमी लागे कि खूप शिका आणि मोठे व्हा. ती दुकान जे चालवायची त्यात पैशांचा हिशेब अगदी चोख असे. गणपतीला आणि शिमग्याला दुकानात जर गर्दी झाली तर मामा, मामी आणि इतर कोणीही ह्यांचा हिशेबाचा बोजवार्या वाजलेला असे पण ही मात्र सगळे दुकान एकटीने सांभाळयाची आणि येणाऱ्या गीर्हय्काला दम द्यायला ही कमी करायची नाही.
तिचे बोलणेच सरळसोट आणि फटकळ आहे. आजही तसाच खणखणीत आवाज आणि ते बोलणे. अगदी जवळची कोणी माणसे जर बऱ्याच दिवसांनी आली तर सरळ विचारेल " इतके दिवस काय मेला होतास काय रे ? आजी आहे कि नाही ते बघायला पण आला नाहीस. का आजी मेली असे वाटले ?" ती तशी सगळ्यांची आजी होती किंवा कोणी वयानी मोठे असतील तर त्यांच्यासाठी ती दत्ताची आई असे. दत्ता म्हणजे माझा मामा.
ही कोकणची माणसे मरणा बद्दल फार आपुलकीनी बोलतात. कोणाविषयी विचारपूस केली कि काय रे बाब्या जित्ता हाए का मेला ? तर उत्तर म्हणून लगेच येणार जळला मेला बाब्या तो मरेल कशास ? मुंबईला जावून लेकाकडे दिवस काढतोय नाही?
बाकी कोकणातील माणसाना भूगोलात आपल्या भारताची सीमा ही बहुदा मुंबई पर्यंत जावून तिथेच संपते असे काही कल्पना असावी. कारण सगळ्यांच्या परिसीमा ह्या मुंबई पर्यंतच जावून संपतात.
मला ते लहानपणीचे दिवस आठवतात. मामाचे घर हे मुख्य गावाच्या नाक्यावरच असल्यामुळे त्या रस्त्यावरून हर तर्हेची मिरवणूक, मोर्चा, झालच तर प्रेतयात्रा सगळे जायचे. रात्री अपरात्री सुद्धा एखादी प्रेतयात्रा चालली असेल कि तिच्या समोरील भजन म्हणारे त्यांच्या आवाजामुळे आजीला जाग आली कि ती आम्हाला सगळ्यांना उठवायची आणि मग आम्ही सुद्धा ती प्रेतयात्रा एखाद्या मिरवणुकीच्या कौतुकानी बघत असू. किंबहुना त्यामुळेच कि काय मला प्रेतयात्रा, प्रेत अशा गोष्टींचे भय लहानपणा पासून नव्हते.
लहानपणी आठवते की दर सोमवारी आजी शंकराच्या मंदिरात जायची अणि आम्हा नातवंड आना घेवुन जायची. तिथे शंकराच्या देवळात अणि सभोवताली विस्तृत असा खेळयाला परिसर होता. नारळी पोफळीची भोवताली सुंदर अशी झाडे होती. आता आजीला तिथे जाता येत नाही आणि आम्हाला तिला तिथे घेवुन जाताही येत नाही. पण तिथे गेलो की आजीचा हात धरून चालत गेल्याची आठवण होत असते.
मुरुड जंजिरा, हे गांव जंजिरा किल्ल्या साठी प्रसिद्ध आहे. जंजिऱ्या वर कलाल बांगडी नावाची तोफ आहे. भारतातील सर्वात मोठ्या तोफा मध्ये हिचा दूसरा नंबर लागतो. स्वातंत्र्यानंतर त्या किल्ल्या वर आता कोणीही तिथे रहात नाही. पण आजी सांगायची की स्वातंत्र्य मिळवण्या पुर्वी ती आणि आजोबा किल्यात सिद्धिच्या बायकाना बांगड्या भरायला जायचे. त्यावेळस ती कलाल बांगडी गड्गडली की म्हणे बायकांच्या हातात्तल्या बांगड्या फुटायच्या. ती तोफ महाराजाना मिळाली पाहिजे होती. मान्य की हिन्दू पत पातशाही स्थापायला तोफेपेक्षा सिंहाच्या काळजाची गरज होती. पण हे असले आयुध जर स्वराज्याला मिळाले असते तर...... असो आजी त्या तोफे सारखी खणखणत असे.
अजुन एक खुप मजेदार गोष्ट माझ्या आजीची. आम्ही आता सगळी नातवंड मोठी झालो. काही जणांची तर लग्न होवून त्याना मुले झाली. म्हणजे माझी आजी खरेतर पणजी झाली. आता फक्त घरात बसून असते. पण अजुनही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा माझ्या हातात शंभर, दोनशे रुपये जसे हाताला लागतील तसे ठेवते. तिच्या उशापशी ते पैसे असतात. ते येतात कुठून हा अजुनही अचंबित करणारा प्रश्न. खरेतर हातावर ठेवलेले पैसे घ्यायचे असे काही आता वय काही माझे राहिले नाही. पण तरीही मी लहान मुलाच्या हातावर ठेवलेल्या पैशा सारखे ते मी घेतो आणि रेवदंडा, अलीबाग येथील चिक्की किंवा ताटगोळे घेतो.
आज इतक्या लांब आल्या वर तिची आठवण सदा बेचैन करते.
२३ फेब्रुवरी २०१२
२१ ला रात्री राहुलचा फोन आला आणि लगेच निघालो. त्याच कोटेश्वरीच्या वळणावर पोहचलो तर रात्रीचा दीड वाजला होता. खिडकीतून तो समुद्र बघितला पण आज तिचा चेहरा काही दिसला नाही. म्हटले अमावस्येची रात्र म्हणून त्या अंधारात दिसला नसेल.
२२ ला सर्व आटोपून परत निघालो. परत त्याच कोटेश्वरीच्या वळणावर आज गाडी थांबवून उतरलो. आज तरी तो चेहरा दिसेल पण इतक्या वेळ साठवलेल्या अश्रूंच्या समुद्रात तो काही दिसेचना. आणि मग इतक्या वेळ आवरलेला बांध फुटला. .....